Wednesday 17 August 2011

पुनश्च क्रांती


अनेकदा मला स्पष्टपणे दिसतं..
संधीप्रकाशात हजारो तलवारी एकमेकींना भिडल्या आहेत, जणू हजारो घंटांचा नाद एकाचवेळी व्हावा..त्यांच्या घर्षणाच्या ठिणग्यांतून वीज चमकल्याप्रमाणे रणांगण निमिषार्धासाठी प्रकाशते.. त्यात दिसतात भान हरपून तलवारीशी एकरूप होऊन परकीय आक्रमकांवर तुटून पडलेले माझेच भाऊबंध. रणांगणाच्या धुळीच्या ढगात सुरु आहे रक्ताचा वर्षाव... ज्या मातीतून आलो त्याच मातीशी एकएक करून एकरूप होणारे तिचे चिरंजीव.. असंख्य वारांमुळे छिन्न- विच्छिन्न माझ्या शरीराचे अवयव मलाच ओळखता येत नाहीयेत. रक्ताने भिजलेल्या तलवारीला जोडलेला तो माझा हातच असावा. वेदनांनी हार मानून माझ्या आधीच प्राण सोडलेला! डोळे, कान आणि मेंदू मात्र पूर्ण शक्तीनिशी वाट पाहतायत विजयी शंखनादाची.. सूर्यास्त जवळ आला आहे, चित्र अस्पष्ट होतंय.. तलवारींचे आवाज शांत होतायत.. एवढ्यात घोषणांचा उद्घोष सुरु झालाय.. दुरून शंखनादहि झाला. स्वतः घाम आणि रक्ताच्या मिश्रणाने भिजलेल्या सेनापतींनी विजयाची घोषणा केली. त्रिभुवन पादाक्रांत करायला निघालेल्या अलेक्झांडरला भारतीय मातीने अस्मान दाखवले. मातृभूमीचा जयघोष कानावर पडत असतानाच अंधारात मी तिच्याशी एकरूप झालो..

हे क्षणहि राहून राहून आठवतात..
सनई- चौघड्यांच्या मंगलमई स्वरात गडावर सर्वत्र लगबग सुरु आहे. नऊवाऱ्यान्मधील सुवासिनी हातात आरती घेऊन तयार आहेत. आज संपूर्ण गड स्वर्गासारखा सजला आहे. लहान- थोर, पुरुष- स्त्रिया, गरीब- श्रीमंत सर्व भेद विसरून या सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत. देशभरातून आलेल्या नामवंत पुरोहितांच्या मंत्रोच्चारांचा धीरगंभीर आवाज सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमतोय. चारशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा आमचे स्वतःचे राज्य येत आहे.. स्वराज्य ! माझ्या डोळ्यासमोरून गेल्या काही वर्षांतील घटनांचा क्रम वेगाने सरकतो. रायरेश्वराच्या मंदिरात मशालींच्या प्रकाशात महाराजांच्या पाठोपाठ महादेवाला घातलेला रक्ताभिषेक. जीवाची परवा न करता शत्रूच्या ताब्यातील एक एक गड जिंकून त्यावर डौलाने फडकणारा भगवा.. जावळीच्या खोऱ्यात मुसळधार पावसात बेभान होऊन शत्रूची उडवलेली दैना.. शत्रूच्या वेढ्यातून महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रचलेला तो गनिमीकावा.. स्वराज्याचे शिलेदार म्हणून घराघरातून मिळणारा तो मान- सन्मान.. खानाचा जिझिया भरता भरता आयुष्य गेलेल्या त्या सुरकुतलेल्या, थरथरत्या हाताचा तो आशीर्वाद.. त्या हिरवट पाणावलेल्या डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या अपेक्षा.. हर हर महादेव.. जय भवानी- जय शिवाजीच्या गर्जनांसह घरा- घरातून आलेल्या हजारो मावळ्यांनी व्यक्त केलेला निर्धार.. हे सर्व डोळ्यासमोरून गेल्यावर रायरेश्वरावर कापलेली उजव्या हाताची करंगळी माझ्याच अश्रूंनी भिजली आहे. अचानक सर्व नजरा माझ्याकडे रोखल्या गेल्या आहेत. मला काळात नाहीये हे असे का पाहतायत माझ्याकडे.. एवढ्यात माझ्या खांद्यावर उर्जेनी भरलेला स्पर्श जाणवला... मी वळून पहिले... महाराज !!! महाराज आपण ?? मी काही बोलायच्या आत स्वतः छत्रपतींनी आलिंगन दिले.. माझ्या डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले.. तोंडातून शब्दच फुटेनात, मनातून विचार गेले, कानातून श्रुती गेली.. धान्य जाहलो.. कृतार्थ जाहलो.. जिवंतपणीच मोक्षाचा अनुभव! समोर भगवा फडकत होता.. आजचे त्याचे रूप काही आगळेच आहे.. स्वराज्यात जो फडकत आहे! अश्रूही भगव्या रंगाने न्हाऊन निघाले..

या घटना तर नुकत्याच घडून गेल्याप्रमाणे मनात ताज्या आहेत..              
गेल्या पाच- सहा वर्षांतला घटनाक्रम लिहून पूर्ण होत आला आहे. जेलच्या या खोलीत फक्त दुपारी तीन तास प्रकाश येत असल्यामुळे त्या वेळेतच लिखाण करणे भाग आहे. बाजूला पुस्तकांचा ढीग लागला आहे. मी डायरीत भराभर उतरवतोय.. लवकरात लवकर हे जेलच्या बाहेर जाणे आवश्यक आहे.. आयुष्यातला सर्वात महत्वाचा चार वर्षांचा कालखंड लिहून काढला आहे.. कॉलेजमधले दिवस.. त्या काळात सहाध्यायी इंग्रज विद्यार्थ्यांनी केलेल्या अपमानानंतर त्यांना सर्वांनी मिळून दिलेला चोप.. एके दिवशी उपहारगृहाच्या भिंतीवर वाचलेले हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे आवाहनपत्र.. त्यानंतर जुन्या क्रांतीकाराकांशी झालेली ती भेट..       त्यांच्या काकोरीतील धरपकडीनंतर संघटना चालवण्यासाठी आम्हा तरुणांवर एकाएकी येऊन पडलेली जबाबदारी.. घरच्यांनी लग्नाचा तगादा लावल्यावर पळून जाऊन कानपूरला गणेश शंकर विद्यार्थींकडे घालवलेले दिवस.. त्यांच्या 'प्रताप' या वर्तमानपत्रात केलेली पत्रकारिता.. एक असाईन्मेंट म्हणून बिहारचा केलेला दौरा.. त्यात दुष्काळाचे, भुकेच्या बळींचे आणि त्याहूनहि भयाण इंग्रजी अत्याचाराचे झालेले संतापी दर्शन.. सर्व घटना कशा काल- परवा घडलेल्या.
अजूनहि आठवतीये यमुनेकाठची ती मीटिंग.. 'एचआरए'च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशाच्या विविध प्रांतातून आलेले क्रांतिकारक अनेक वर्षांनी एका झेंड्याखाली एकत्र येत आहेत.. तरुण भारताचं ते एक अनौपचारिक संमेलनच होतं. कॉंग्रेसच्या मिळमिळीत धोरणाचा विरोध हि त्या सर्वांमधील समानता असली तरी भूक, भयमुक्त, शिक्षित, आरोग्यसंपन्न, जाती- धर्मविरहित समाजाची संकल्पनाही सर्वांना पटलेली. त्यातूनच हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच हिंदुस्तान सोशलीस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये (एचएसआरए) झालेलं रुपांतर.. 
यानंतर महिनोंमहिने सर्वांनी एकत्र घालवलेले कानपूर- लखनौमधील दिवस.. लाहोर- फिरोजपुरचे दौरे.. संघटनेची बांधणी.. पूर- दुष्काळामध्ये केलेलं कार्य. सर्वजण झपाटून काम करीत होते. वय असं होतं तरी किती.. एकोणीस- वीस. एकीकडे इंग्रजी अत्याचार वाढत असताना कॉंग्रेस मात्र, डोमेनियन स्टेटसची मागणी करीत होती. सायमन कमिशन आलेलं.. सायमनविरोधी प्रदर्शनात लाहोरमध्ये लालाजींवर झालेला लाठीहल्ला, त्यात त्याचं झालेलं निधन. आणि स्कॉटच्या हत्येने आम्ही घेतलेला बदला.. लाहोरमधून शिताफीने निसटून कलकत्ता- आग्र्यात सुरु राहिलेलं काम. ट्रेड डिसप्युट बिलाविरोधात आम्ही संसदेत केलेला धमाका.. त्यानंतरची धरपकड.. जेलमधले दिवस.. इंग्रजांकडून होणाऱ्या भेदभावाविरोधात उपोषणाचे हत्यार आणि त्याला देशातील नागरिकांकडून आजपर्यंत कधीही न मिळालेला असा अभूतपूर्व प्रतिसाद.. कालांतराने इतर साथीदारांच्या अटकेनंतर जेलमधेच सर्वांची पुन्हा झालेली भेट..
स्कॉट हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा जाहीर झाल्यावर तिघांना वेगळे करण्यात आले. बाहेर देश पेटला आहे. तरुण वर्ग 'एचएसआरए'ची भाषा बोलू लागला आहे. जे काम आम्हाला बाहेर असताना जमले नाही, ते आता शेवटची घटका जवळ येत असताना साध्य होत आहे. मनात विचार येतो शेवटी क्रांतिकारकाची भूमिका असते तरी काय.. हीच ना.. आपल्या सर्वोच्च समर्पणातून देशाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देणे.. एका आदर्शवादी चित्राचे स्वप्न दाखवणे आणि ते साध्य करण्यासाठी चैतन्य निर्माण करणे. हे जर साध्य होत आहे, तर माझा जन्म सार्थकी लागला आहे. याचसाठी तर होता हा जन्म. आयुष्य किती दिवसांचे याला काय महत्व.. जन्माचा हेतू साध्य झाला ना हे महत्वाचे.. पण अजूनहि खूप काही करायचे आहे.. ते विषमतामुक्त समरस समाजाचे, वैभवशाली भारताचे आदर्शवादी चित्र अजूनही अपूर्णच आहे. काही वेळा वाटतं आणखी काही दिवस मिळाले असते तर.. अजून खूप काही करता आलं असतं.. पण या जन्माचे दिवस कदाचित एवढेच होते..
डायरीवर कोणाचीतरी सावली पडली.. लिखाण थांबवून मी वर पहिले.. अरे जेलरसाहेब.. यावेळेला?..''शेवटची ऑर्डर आली आहे.." गंभीर भाव आणि दाटलेल्या गळ्याने त्यांनी हे शब्द कसेतरी उच्चारले.. जेल बाहेरून घोषणांचा आवाज सुरूच आहे. काही जणांना वाटतंय कि अजूनहि आम्ही सुटू शकू.. सूर्यास्ताबरोबर आमचा मुक्तीद्वाराकडील प्रवास सुरु झाला.. मनात कसलीही भीती नाही.. तिघांच्या एकत्र जाण्याने एक वेगळाच उत्साह संचारला आहे. जेलबाहेरील इन्क्लाब्च्या घोषणांमध्ये मग आमचाही आवाज मिसळतो. गंगे- यमुनेकाठी एकत्र गायलेली मातृभूमीची गीते अपोआप तोंडातून बाहेर पडू लागतात. आम्ही तिघे सोडून सर्वांचेच चेहरे पडलेले.. अखेर आमच्या लक्षापर्यंत पोचलोच.. गगनभेदी घोषणा झाल्यावर डोक्यावर काळी टोपी घातली जाते.. हात- पाय बांधलेले.. गळयाभोवतीचा दोर आवळला जातो.. थरथरत्या हातांनी जल्लाद आपले काम पार पाडतो.. पायाखालची फळी सरकते.. तिघेही काही फुट खाली कोसळतो.. मानेला हिसका.. काहीवेळ शरीराची हालचाल..तीही शांत होते.. काळोखात ते  वैभवशाली भारताचे चित्र तेवढं दिसतंय..

कोण आहे मी?
एक अस्वस्थ आत्मा!
काळे ढग दाटून आल्यावर शरीर धारण करणारा..
क्रांतीचे रणशिंग फुंकून चैतन्य फुलवणारा..
एक अदृश्य उर्जा आहे.. कंप नियंत्रित करणारी..
बेताल शक्तींना काबूत ठेवणारी..
अगदी निर्मितीपासून या मातीतच माझे अस्तित्व..
येथील नद्यांमधून मी प्रवाहित आहे, या आकाशातच मी विहारत आहे..
अमरत्वाचा वर असणाऱ्या मला प्राप्त आहे भावना, मातीशी एकरूपतेची आणि फक्त समर्पणाची!
युगानुयुगे मी जन्म घेतोय.. घेत राहीन.. लक्ष्यप्राप्तीनंतरच मुक्त होईन..

आकाशात पुन्हा काळे ढग दाटून आले आहेत.. विजा चमकत आहेत..
.. या मातीतूनहि एक वावटळ उठले आहे.. 
दऱ्या- खोऱ्यांतून.. नद्यांच्या पात्रांतून ते घोंघावत वाढत आहे.. विस्तारत आहे..
आता त्याचे एक वादळ झाले आहे.. त्यानेही गर्जना केली आहे..
..क्रांती..क्रांती !

- मयुरेश (२५ जून २०११)