Tuesday 21 June 2011

२२ जून १८९७ ... २२ जून २०११



२२ जून १८९७ 

पावसाचे नुकतेच कुठे आगमन झाले होते. छतांमधून गळणारे पाणी आणि भिंतींना आलेली ओल काढण्यासाठी पेठांमधील वाड्यांची डागडुजी सुरु होती. पावसाळा नेहमीसारखाच असला, तरी हवामान नेहमीसारखे मुळीच नव्हते. यावेळी घरे स्वच्छ रहावीत, हवा खेळती राहावी यासाठी म्युनिसिपालटीकडून कडक नियम आखून देण्यात आलेले होते. शहरात गेले अनेक महिने प्लेग जो आला होता. सकाळी काखेत दुखल्यासारखं होऊ लागल्यावर, दुपारी गाठ येऊन ताप भारत असे. संध्याकाळी त्याचे प्रेत जाळून येईपर्यंत दुसऱ्याच्या काखेत गाठ.. हे चक्र वेगाने सुरु होते. शेकडोंच्या संख्येने दररोज मारणाऱ्यांची संख्या वाढत होती. पावसाचा ओलावा आणि पेठांमधील कुबट वातावरणामुळे प्लेगने चांगलेच हातपाय पसरले होते. असं एखादाच घर असेल, ज्या घरातील कोणावर या साथीमध्ये अंत्यसंस्कार झालेले नसतील.
लोक अक्षरशः हवालदिल झालेल्या अशा स्थितीत पुण्यात 'साथ नियंत्रणाचा कायदा' लागू केला गेला.. हा कायदा योग्य रीतीने लागू होतो कि नाही हे पाहण्यासाठी कमिशनरहि नेमला गेला.. नाव होते रैण्ड. शहराची निम्मी लोकसंख्या स्वर्गवासी झालेली, अनेकांनी पुणे सोडलेले अशा स्थितीत प्लेग नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याची मदत घेण्यात आली. लोकांच्या आरोग्याची तपासणी करा, घरे स्वच्छ आहेत कि नाही ते पाहा, कोणाच्या काखेत गाठ आहे कि नाही तपासा, कोणी संशयित आढळले कि त्याला थेट दवाखान्यात दाखल करा.. असे निर्देश देण्यात आले. त्याच्या उद्देशाप्रमाणेच गोऱ्या सैनिकांनी ते मर्यादेत राहून ऐकले असते, तर गोष्ट वेगळी होती. मात्र, या त्यांनी शहरात उन्माद घातला. कोणाच्याहि घरात घुसून बायका- मुलींवर हात टाकायला सुरवात केली, स्वच्छतेच्या नावाखाली देव्हारे घराबाहेर फेकण्यात आले. अनेक ठिकाणी तर घरातील दाग- दागिनेही लुटले. सनातनी पुणेकरांना या गोष्टी रुचतील, तर नवलच. शहरातील गोऱ्यांचा उच्छाद सुरूच होता. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्रजांना चांगलाच धडा शिकवणे आवश्यक होते. केसरी, सुधारकमधून मथळेच्या मथळे भरून सरकारच्या या कृतीच्या विरोधी मजकूर छापून यायला लागला. मुळातच क्रांतिकारी रक्त आणि छत्रपतींच्या संघर्षमय इतिहासाची जाणीव असणाऱ्या काही तरुणांच्या मुठी शहरात चाललेल्या या प्रकारांमुळे वळू लागल्या. टेकडीवर बसून केसरीचे सामुहिक वाचन झाल्यावर व्यायाम, लाठी- काठी, खड्गाचा सराव सुरु झाला. चिंचवड- पुणे धावत फेऱ्या तर नेहमीच होत. दरम्यान, शहरातील काही टग्यांना आणि काही 'गोऱ्या माकडांना' अंधारात चोप देऊन आपला राग व्यक्तहि करून झाला.
मात्र, एवढे पुरेसे नाही याची जाणीव त्यांना होती. शहरातील इग्रजांच्या उन्मादावर नियंत्रण आणायचे असेल, तर हवा होता एक सनसनाटी इशारा.. ठरलं.. थेट मुळावरच वार करायचा.. ज्याच्या पुढाकाराने हे होत आहे, त्या रैण्डलाच टिपायचा. सराव सुरूच होता, प्रयत्न करून पिस्तुलही मिळालं. लाठीकाठीच्या जोडीला नेमबाजी सुरु झाली. पाळत ठेवण्यात आली. तो दिसतो कसा, दिवसभर काय करतो, एवढ्यातले कार्यक्रम काय आहेत.. आणि योगायोगाने मुहूर्तही मिळाला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याला ६० वर्षे पूर्ण झाल्याचा. या निमित्ताने इंग्रजी राजवट पोचलेल्या ठिकाणी जगभर ही घटना मोठ्या दिमाखात साजरी होत होती. तशीच ती पुण्यातही होणार होती. गव्हर्नरतर्फे शहरातील इंग्रज अधिकाऱ्यांसाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मोठी आतिशबाजीही करण्यात येणार होती. रैण्डही या कार्यक्रमाला येणार होताच. गणेश खिंडीजवळ असणाऱ्या गव्हर्नर बंगल्यातील पार्टी आटोपली, की त्याला खिंडीत गाठायचे आणि तेथून थेट यमसदनी धाडायचे याची व्यूहरचना आखली गेली.
दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे कीर्तनकार हरि चापेकरांचे तिघे चिरंजीव त्यांचे सहकारी महादेव रानडे आणि खंडो साठे यांच्यासह रैण्डच्या मार्गाचा मागोवा घेऊन आले. रैण्डचा वेध घेण्याची जबाबदारी बाळकृष्णने उचलली. २२ जून, १८९७ चा सूर्य मावळला. चतुःशृंगीचे दर्शन झाले. आईकडे वर मागितला.. "आई अंबे, जगदंबे जातो सत्कर्मी वर दे.. रिपूदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे.." टेकडी उतरून खिंडीतल्या गजाननाचे दर्शन घेतले आणि प्रत्येकाने आपआपल्या जागा धरल्या. गव्हर्नरच्या बंगल्याकडे इंग्रजी अधिकाऱ्यांच्या बग्ग्या येणे- जाणे सुरूच होते. त्यातली रैण्डची कोणती हे यांनी आधीच हेरून ठेवले होते. आज राणीच्या राज्यारोहणाच्या हिरकमहोत्सवानिमित्त होणारी अतिषबाजी पाहायला रस्त्यावर गर्दीही होती. अंधार दाटू लागला तशी रस्त्यावरची गर्दी कमी होऊ लागली. कार्यक्रम संपून एकेका इंग्रजी अधिकाऱ्यांच्या बग्ग्या कैम्पातल्या बंगाल्यांकडे परतू लागल्या. त्यात रैण्डची बग्गी दिसली की, 'गोंद्या आला रे..' अशी आरोळी द्यायचे निश्चित झाले.
काही बग्ग्या गेल्यावर घोड्याच्या टापांसह घुंगरांचा आवाज आणि चाबकाचे फटकारे ऐकू आले. बग्गीच्या कंदिलाचा मंद प्रकाश प्रखर होताना दिसला.. 'अरे हाच तो रैण्ड' असे मनात येताच.. एकाने जोरदार आवाज दिला.. 'गोंद्या आला रे..' बग्गी पिवळ्या बंगल्यावरून पुढे सरकताच बाळकृष्णने बाग्गीचा पाठलाग करून  पिस्तुलाचा चाप ओढला.. आणि बग्गीत बसलेल्या अधिकाऱ्याचा वेध घेतला. बाजूला बसलेल्या त्याच्या बायकोच्या मांडीवरच त्याने प्राण सोडला..अंधाराचा फायदा घेऊन बाळकृष्ण पसार झाला.. थोडा वेळ शान्तता पसरली.. पुन्हा घोड्याच्या टापांचा आणि चाबकाच्या फटक्यांचा आवाज.. पुन्हा आरोळी..'गोंद्या आला रे..'..'गोंद्या आला रे..' अरे हे काय झालं? म्हणजे मगाशी कोणी भलताच यमसदनी गेला. ही गोष्ट दामोदर हरि चापेकरांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी बग्गीचा पाठलाग केला, पिस्तुलाचा चाप ओढला.. फ़ाट.. फ़ाट आवाज आले.. अतिषबाजी सुरूच असल्यामुळे अंधारात हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. बग्गी तशीच पुढे निघून गेली.
काम फत्ते झाल्याच्या आनंदात रात्रभर कोणाला झोप लागली नाही. २३ ला सकाळी १०-११ च्या दरम्यान शहरातून बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली..प्लेग कमिशनर रैण्डवर गोळीबार.. जबर जखमी, ससूनमध्ये मृत्यूशी झुंज, अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात लेफ्टनंट आयर्स्ट जागीच ठार..शहरात जल्लोष सुरु झाला. अनेकांनी साखर वाटली. शेकडोंच्या मनातील इच्छेला क्रांतिकारी रक्ताने मूर्त रूप दिले होते.. "गणेशखिंडीतील गणपती पावला.. बळवंतराव.." दामोदर हरि चापेकरांनी लोकमान्यांना आनंदाने ही बातमी दिली... "हो, समजलं ते मला.. आता सगळे जपून राहा.." स्वातंत्र्य संग्रामाच्या सर्वोच्च नेत्याने दिलेल्या आशीर्वादाने सर्वांना कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. शस्त्रे एका विहिरीत टाकून, नकळतपणे मुंबईला प्रयाण केले. ३ जुलैला रैण्डने ससूनमधेच प्राण सोडले.
पुढे बक्षिसाच्या मोहापायी द्रविड बंधूंनी चापेकारांविषयी पोलिसांना माहिती दिली आणि त्यात दामोदर चापेकर पकडले गेले. या देशद्रोह्यांनाही शिक्षा व्हायला हवी म्हणून धाकट्या वासुदेवने रानडे आणि साठे यांच्या मदतीने द्रविड बंधूंनाही यमसदनाला धाडले. एक चक्र पूर्ण झाले. १८ एप्रिल १८९८ ला दामोदर हरि चापेकर, ८ मे १८९९ ला वासुदेव हरि चापेकर, १० मे १८९९ ला महादेव रानडे आणि १२ मे १८९९ ला बाळकृष्ण चापेकरांना येरवडा जेलमध्ये  फाशी देण्यात आले.      
--------------------------------------------------------------------------------
२२ जून २०११
चिंचवडवरून निघून रात्री दीडच्या सुमारास गाडी विद्यापीठावरून चालली होती. ब्रेमेन चौकातील झगमगाटानंतर कोंक्रिटच्या रुंद रस्त्यावरून गाडीने आणखी वेग घेतला. ८० असेल. पण आमच्या त्या वेगालाही ओलांडून इतर गाड्या आणखी वेगाने काही सेकंदात दिसेनाशा होत होत्या. दोन- एक मिनिटात गाडी विद्यापीठ चौकात आली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर काही पोलीस आणि पार्क केलेल्या काही गाड्या होत्या. फ्लायओव्हरच्या खालून सर्व दिशांनी अजूनही गाड्यांची ये- जा सुरूच होती. वैकुंठ मेहताजवळ थांबून उजवीकडे खिंडीतला गणपती दिसतो की नाही ते पहायचा प्रयत्न केला, पण बरेच प्रयत्न करून एका पॉईन्ट वरून फक्त कळस दिसला. गाडी पुढे सरकली.. एनआयसी, एचडीएफसी- एक्सिसच्या मोठ्या इमारती, आणखी पुढे गेल्यावर नव्या मोठ्या मॉलचे काम सुरु होते. समोर सुरु होणाऱ्या दुसऱ्या फ्लाय ओव्हरच्या खालूनच गाडी घेतली. खाली किमान ५०-६० कार्सची रांग लागली होती. त्यात जगातील सर्व नामवंत ब्रांडच्या गाड्या होत्या. 'ई- स्क्वेअर'चा नाईट- शो अजून संपायचा होता. सिनेमाच्या पोस्टरवर नजर टाकली..भिंडी बाजार, एक्स मेन, आणखीही बरेच होते.. २५-३० रिक्षावाले शो संपायची वाट पाहत होते.. गाडी पुढे आली, डावीकडे कृषी बैन्किंग महाविद्यालय लागले.. गाडी हळू केली. माझी नजर त्याच्या भिंतीच्या जवळून गाडीच्याच वेगाने सरकू लागली. भिंतीला लागून फुटपाथ आहे. त्याच्या मधेच एक छोटासा मंडप घालून लोकांनी लक्ष्मी मंदिर म्हणून नाव दिले आहे. कृषी बैन्किंग महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटरवर येऊन गाडी थांबवली. हेच ते ठिकाण होते, जिथे दामोदर हरि चापेकरांनी रैण्डवर गोळ्या झाडल्या होत्या. दामोदर हरि चापेकारांचा अर्धाकृती पुतळा आणि फासावर गेलेल्या इतर तिघांचे म्यूरल रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात निरखू लागलो. खाली काहीतरी माहिती दिली होती. पण, पुसली गेल्याने ती वाचता आली नाही. थोडा मागे चालत गेलो.. कृषी बैन्किंगच्या भिंतीच्या कडेला अनेक वर्षे एक स्मृतीशीळा होती. रैण्ड आणि आयर्स्ट यांच्यावर ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्याच्या  स्मृतीप्रीत्यर्थ तेथेच इंग्रजांनी ती बसवली होती. इंग्रजांसाठी ती शीळा जशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या स्मृतीसाठी महत्वाची होती, तशीच भारतीय तरुणांसाठी ती अभिमानाची होती. भारतीय स्वातंत्र्याच्या शेवटच्या सशस्त्र लढ्याच्या प्ररम्भाचे ती प्रतिक होती...
काळ सरला तसे गणेशखिंड रस्त्याचे रूपच पालटले. पूर्वीचे जंगल आता शहरातील सर्वात झगमगीत रस्त्यात बदलले आहे. शहरातील तरुणाईच्या सेलीब्रेशनचे ते एक मुख्य केंद्र आहे. त्यामुळे या रस्त्याच्या शोभेआड येणाऱ्या सर्व गोष्टी हटवण्याच्या मॉलधारकांच्या मागणीला महापालिकेनेही तत्पर प्रतिसाद दिलेला दिसतो.. म्हणूनच की काय, ती ११३ वर्षे जुनी स्मृतीशीळा मला शोधून सापडली नाही. चापेकरांच्या पुतळ्याच्या बाजूला फूटपाथच्या मधूनच एक कोरीव दगड अर्धवट वर आलेला मात्र दिसला.
मी गाडी सुरु करून निघालो तो पर्यंत ई स्क्वेअरचा नाईट शो संपून त्या ब्रांडेड गाड्या हॉर्न वाजवत वेगाने शहराच्या पूर्वेकडे निघाल्या. २२ जून १८९७ ला घोड्याच्या टापांचा, घुंगराचा आणि चाबकाच्या फटाक्यांचा आवाज करीत साहेबाच्या बग्ग्या याच रस्त्यावरून पूर्वेकडे धावल्या होत्या.      



2 comments:

  1. Sundar!

    manapasun avadala :-)

    ReplyDelete
  2. या पोस्टने अपेक्षा वाढवल्या आहेत! १८९७ ते २०११ ही उडी तुम्ही वाचकांना सोबत घेऊन मारलीत, त्याबद्दल आभार. सध्या मॉन्सून डायरीत बिझी असाल, पण इथल्या वाचक- फ्रेंडली 'गुरुत्वा'कर्षणामुळे पुढल्या पोस्टची वाट नक्कीच पहिली जाते आहे.

    ReplyDelete