Monday, 14 January 2013
अंकुर
दूर दिसणाऱ्या करपट गवताच्या कुरणाखाली शुष्क झालेल्या काळ्या मातीतील ती छोटी भेग त्याला कित्येक दिवस खुणावत होती. परिपक्व होऊन त्या विशाल वृक्षापासून मुक्तता मिळून कित्येक दिवस लोटले होते. मात्र, सुकलेल्या पानांच्या आडोशामागे तो अशाप्रकारे बंदिस्त झाला होता की, त्या पानांच्या जाळीदार भिंतींमागे घडणारा आजन्म कारावासच. सूर्य या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत जास्तोवर येणारे आगीचे झोत सहन करत आता अंगावरील इवलेसे कवचही करपून गेलेले. रात्री सुकलेल्या पानांच्या जाळीपलिकडे आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यांचाच काय तो आधार. तरीही आशा होती ही तपस्या कधीतरी फलद्रूप होणार..
अखेर तो दिवस आला. डोक्यावर तळपणारा सूर्य इवल्याशा कवचाचे शेवटचे कणही करपवू लागला. अंकुरण्याआधीच जाळीदार कारागृहात आपल्या अंताची चाहूल लागलेल्या त्या बीजाला दूर काळ्या मातीतील भेग अस्पष्ट होताना दिसू लागली. डोळ्यासमोर अंधारी आली. कारागृहात काळोख पसरला.. सूर्य दिसेनासा झाला, जाळी पलिकडची ती भेग आणि जाळीही.. कदाचित हा जन्म स्वप्नवतच असेल..
इतक्यात कानावर सळसळ आली. हळूहळू तीव्रता वाढू लागली. सुकलेल्या पानांचे कारागृहही हादरू लागले. जाळीतून पुन्हा काहीतरी अस्पष्ट दिसू लागले. दूरवर धूळीचे लोट वाहत होते. काळ्या जमिनीवरील ते करपटलेले गवत वाऱ्याची दिशा दाखवू लागले. वर आकाशात पहिले तर सूर्याला एका प्रचंड कृष्णमेघाने ग्रासलेले. वारा घोंघावू लागला. वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला धक्के देऊ लागला. असंख्य सुकलेल्या पानांचे थवे आजूबाजूने वेगाने दूर दूर जात असल्याचे दिसत होते..
एकाएकी त्या बीजाच्या शरीरात विजेसारखी ऊर्जा प्रकटली. पुन्हा आशा पल्लवित झाली. एवढ्यात वाऱ्याच्या जोरदार धडकेने ते सुकलेले जाळीदार कारागृह हवेत उडाले. थोड्या अंतरावर त्याच्या भिंती कोसळल्या.. त्यांचेही थवे दूर अस्पष्ट होताना दिसले. मात्र, त्या बीजाच्या अंगावरील कवचाची राख कधीच उडून गेलेली. अगदी पंख छाटल्याचाच भास होत होता. जन्माला आल्यावर वाटले होते, वाऱ्याची एखादी झुळूकही पुरेल. या कवचाच्या पंखांमुळे अलगद उडत त्या भेगेपर्यंत सहज पोहोचता येईल. मात्र, आता पंखांविना एवढा मोठा पल्ला गाठायचा कसा? एका कारागृहातून तर मुक्तता झाली.. पुन्हा दुसऱ्यात अडकलो तर?
मात्र, इतक्या दिवसांची कठोर तपस्या फळाला आली होती. ज्या वाऱ्याने त्या कारागृहाचे थवे उडवले त्याच वाऱ्याने त्या इवल्याशा जीवाला त्याच्या इच्छीत स्थळापर्यंत सुखरूप पोचवले. त्या अंधाऱ्या गर्भात त्याला जगातील सर्वात सुरक्षित आणि सुंदर जागेत आल्याची जाणीव झाली. मन भरून आले. भेगेतून दिसणाऱ्या फटीतून मग वाराही बीज सुरक्षित आहे ना याची खात्री करून गेला. त्याच फटीतून दूर उंच आकाशात काळ्या मेघांची दाटी झाली होती. गडगडून तेही जणू सुटकेबद्दल त्याचे अभिनंदन करत होते. इतक्यात वेषांतर करून त्यांनी थेट जमिनीवर कोसळायला सुरुवात केली. फटीतून दिसणाऱ्या आकाशातून एक बिंदू मोठा होताना दिसला आणि क्षणात भेगेतून वेगाने प्रवेश करत त्याने बीजाला आलिंगन दिले. अनेक दिवस होरपळून निघालेल्या त्या शरीराला त्यावेळी झालेला आनंद प्रणयाच्या परिपूर्णतेचाच होता. पाहता पाहता जमिनीवरून पाण्याचे लोट वाहू लागले आणि भेगेतून दिसणारे आकाश अस्पष्ट होत गर्भाचा मार्ग बंद झाला..
एके सकाळी वाऱ्याची झुळूक त्या भागातून फिरत होती तिला काळ्या मातीत एक अंकुर फुटलेला दिसला. आनंदाने जवळ जाऊन तिने अलगद त्या अंकुराला कुरवाळले.. अंकुरही गालातल्या गालात हसला..
- मयुरेश (१८ एप्रिल, २०१२)
विस्तार जरा आकाश, चमकुदे आणखी चार तारे
एखादा सूर्यही असेल बघ त्यात..
तीन फुटी खिडकीतून दिसत असेलही आकाशाचा निळा तुकडा
रात्री त्या काळ्या तुकड्यात इच्छा पूर्ण करणाऱ्या उल्काही दिसत असतील कदाचित..
वर्षभर खिडकीतून भेटत असतील ऋतू..
चौकटीत इथे असं बसून थंडीच्या लाटेत गारठत असशील
आणि चिंब भिजतही असशील मॉन्सूनच्या पावसात ...
पण क्षितिजाचा परिघ आणि आकाशाच्या घुमटाची खोली
तुझ्या द्विमितीय चौकटीतून कधी जाणवली आहे तुला?
ये जरा अशी बाहेर.. बघ तुलाही आणखी एक मिती आहे
तुलाही खोली आहे..
विस्तार जरा आकाश, चमकुदे आणखी चार तारे
एखादा सूर्यही असेल बघ त्यात..
- मयुरेश
१४ जानेवारी, २०१३
Subscribe to:
Posts (Atom)